
ऊरूसानिमित्त आयोजन : चटकदार ५० कुस्त्या
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या ऊरसानिमित्त शनिवारी (ता.२८) सायंकाळी येथील संत बाबा महाराज कुस्ती मैदानात आयोजित जंगी कुस्ती मैदानामध्ये इचलकरंजी येथील प्रशांत जगताप आणि मुरगुड येथील मंडलिक आखाडा येथील पैलवान रोहन रंडे यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लागली. त्यामध्ये इचलकरंजीच्या प्रशांत जगताप यांने अमित वडाच्या पैलवान रोहन रंडे याला मच्छी गोटा डावावर १९ मिनिटात चितपट करून कुस्ती जिंकली. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या कुस्तीच्या निकालानंतर कुस्ती प्रेमी नागरिकांनी जल्लोष केला.
प्रारंभी रमेश देसाई -सरकार, रणजीतसिंह देसाई -सरकार व ऊरुस आणि कुस्तीकमिटी पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे उद्घाटन झाले.

कागल येथील पैलवान सचिन बाबर आणि मुरगूड येथील अनिकेत पाटील यांच्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती लावली. उशिरापर्यंत ही कुस्ती चालल्याने गुणाच्या आधारावर सचिन बाबर विजयी झाला. त्यानंतर तृतीय क्रमांकाची कुस्ती ढोणेवाडी येथील प्रशांत कांबळे आणि अर्जुनवाडा येथील महेश पाटील यांच्यात झाली. त्यामध्ये लाटणे गावावर प्रशांतने महेशला आस्मान दाखविले. प्रतीक खोत आणि पंकज हेगडे यांच्यात चौथ्या क्रमांकाची कुस्ती लावली. त्यामध्ये पंकजने प्रतीकवर घिस्सा डावावर मात केली. तसेच अर्जुन शिंदे वैभव मगदूम यांच्यासह नामवंत मल्लांनी चांगली खेळी करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. याशिवाय ५० लहान मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
पंच म्हणून धोंडीराम पावले मारुती मस्ताने, पितांबर कांबळे, राजू पैलवान, शिवाजी संकपाळ, सुरेश लंबे, बाळू मेटकर, शंकर बागणे, महावीर कांबळे यांनी काम पाहिले. राजाराम चौगुले यांनी कुस्ती स्पर्धेचे समालोचन करत कुस्तीचा इतिहास सांगितला.
यावेळी पितांबर कांबळे, मोहन पाटील, प्रभाकर पाटील, योगेश कोठीवाले, संतोष गंथडे, अमोल भोसले, आतिश सुतार, स्वप्निल हरेल जगदीश पावले, राजू क्षीरसागर यांच्यासह निपाणीभागातील कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta