निपाणीत नागरिकांमध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : सरकारी कार्यालयासह इतर ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी भ्रष्टाचारासह लाच प्रकरणे वाढत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी लोकायुक्त आणि पोलीस विभागातर्फे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये. याशिवाय सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्यास तात्काळ त्याची माहिती लोकायुक्तांना देऊन सहकार करावे, असे आवाहन बेळगाव लोकायुक्त विभागाचे उपनिरीक्षक अजीज कलादगी यांनी केले.
शनिवारी (ता.४) सकाळी येथील नगरपालिका कार्यालयात तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांच्या अध्यक्षतेखाली लोकायुक्त आणि पोलीस विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर येथील बस स्थानकात विद्यार्थी महिला आणि नागरिकांमध्ये जनजागृती करून ते बोलत होते.
मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तलवार म्हणाले, सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे करत असताना अधिकारी व कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी केली जाते. अशावेळी तात्काळ लोकायुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित प्रकरणाची माहिती द्यावी. त्यामुळे कोणतीही कामे तात्काळ करण्यासह भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवणे शक्य होणार असल्याचे सांगितले. अजीज कलादगी आणि तळवार यांनी बस स्थानकातील प्रवासी महिला विद्यार्थिनी आणि युवकाशी संपर्क साधून भ्रष्टाचाराला खत पाणी न घालण्याचे आवाहन केले. बस स्थानकासह परिसरात याबाबतची भीत्तीपत्रके लावण्यात आली.
यावेळी लोकायुक्त कार्यालयातील एल. एस. होसमनी, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, हवालदार राजू दिवटे, किरण चव्हाण, आगार नियंत्रक एम. जी. करोशी यांच्यासह नगरपालिका आणि तालुका पातळीवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta