रयत संघटनेचे राजू पोवार यांचे मार्गदर्शन
कोगनोळी : कर्नाटक सीमाभागासह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 3 हजार रुपयांपर्यंत दर जाहीर करुन ऊसतोड सुरु केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे.
गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा अशी मागणी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची आहे. हा दर मिळविण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासह २७ नोव्हेंबरनंतर लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले.
मत्तीवडे (ता. निपाणी) येथे ऊस उत्पादक शेतकरी आणि रयत संघटना कार्यकर्त्यांच्या जनजागृती बैठकीत बोलत होते.
राजू पोवार पुढे म्हणाले, जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आपण १५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली. पण कारखान्यांनी योग्य दर न दिल्याने २७ नोव्हेंबरपर्यंत दराची वाट पाहणार आहोत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गेल्या २० वर्षापासून रयत संघटना आंदोलन करीत आहे. तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत पकडले आहे. सरकारला कारखान्याच्या उपपदार्थामधून जादा रक्कम मिळत असते. त्यामुळे सरकारने प्रतिटन २ हजार रुपये दिले पाहिजेत. रयत संघटनेची मागणी मान्य न केल्यास बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, कृषिमंत्री, साखर मंत्री व अन्य मंत्र्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
यावेळी मत्तीवडे शाखाध्यक्ष शरद भोसले, उपाध्यक्ष चिनू कुळवमोडे, प्रविण पाटील, संग्राम जाधव, सोनू उर्फ परशुराम कदम, राहुल खाडे, सतिश पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta