उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल; निपाणी बस स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यामध्ये जनजागृती
निपाणी (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून बस स्थानक आवारात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्र राज्यातून निपाणी आगारात चोरट्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अनोळखी आणि संशयित रित्या बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या नागरिकाबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असे अवाहन उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल यांनी केले. बस स्थानक परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.३०) येथील बस स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये जनजागृती प्रसंगी ते बोलत होते.
उपनिरीक्षक कोतवाल म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी शहर आहे. त्यामुळे त्या परिसरात महाराष्ट्रातील गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. घरफोड्यासह किसे कापू व दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. गर्दीच्या वेळी अशा घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी बस स्थानकात पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी अशा घटनाबाबत तात्काळ पोलिसांनी माहिती दिल्यास चोरट्यांना जेरबंद करणे शक्य असल्याचे सांगितले. याशिवाय महिलांनी अंगावर कमी दागिने घालून प्रवास केल्यास चोरीच्या घटना टळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. एन. नेगीनहाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी व खाद्यपदार्थ विक्रेते उपस्थित होते.