Sunday , September 8 2024
Breaking News

निपाणीत नव्या तलाव निर्मितीची योजना

Spread the love

 

माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर : निपाणीत बैठक

निपाणी (वार्ता) : शहराच्या लकडी पुलापासून सुमारे १०० एकर जागेत नव्या तलाव निर्मितीचा प्रस्ताव आहे. यासाठी १७५ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा प्रस्ताव पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना देणार आहोत, अशी माहिती माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिली.
निपाणीतील पाणी नियोजनासंदर्भात गुरुवारी (ता.७) आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
गाडीवड्डर म्हणाले, निपाणीत १९५६ साली तत्कालीन नेत्यांनी पुढील ५० वर्षांचे  नियोजन करून जवाहर तलावाची निर्मिती केली. त्यानंतर सन २००० पर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. २००१-२ मध्ये तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील, मंत्री वीरकुमार पाटील यांनी काळम्मावाडी करार केला. याचा शहर व तालुक्याला चांगला लाभ झाला आहे.
मात्र गेल्या काही वर्षात शहर व परिसराचा विस्तार वाढून पाण्याचा वापर वाढल्यामुळे २०१८ नंतर निपाणी शहराला पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या सरकारच्या कार्यकाळात विद्यमान आमदार, खासदार भाजपचे आणि नगरपालिकाही भाजपच्या ताब्यात होती. पण त्यांनी पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. निपाणी शहरासाठी पाण्याचे पुढील ५० वर्षांचे नियोजन करणे आवश्यक असून यासाठी आणखी एका तलाव निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे.
एकरी ५० लाख रुपये याप्रमाणे १०० एकर जागेचे ५० कोटी रुपये सदर शेतकऱ्यांना द्यायचे आहे. १०० कोटी रुपयांच्या निधीतून तलावाची निर्मिती आणि २५ कोटी रुपयांच्या निधीतून जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनी व्यवस्था अशा प्रकारे १७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शुक्रवारी (ता.८) यांच्यासमोर सादर करणार आहोत. त्याला मंजुरी मिळाल्यास सन २०७५ पर्यंत निपाणी शहराचा पाणीप्रश्न निकाली लागणार आहे. सदरचा प्रस्ताव काँग्रेस सरकारच मंजूर करू शकते, याचा विश्वास असल्याचे गाडीवड्डर यांनु सांगितले
यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार,  शौकत मनेर, दत्तात्रय नाईक, डॉ. जसराज गिरे, संजय पावले, शेरू बडेघर,  अनिता पठाडे, दीपक सावंत, सुनील शेलार, विशाल गिरी, अनिस मुल्ला उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *