
निपाणी (वार्ता) : प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी कृषक संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या साहित्यकृतीला मागील एकवीस वर्षांपासून ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी २२ वा पुरस्कार निपाणीच्या कन्या आणि सध्या कोल्हापूर येथील रहिवासी सुचिता घोरपडे यांच्या ‘सांजड’ या कथासंग्रहास घोषीत करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध लेखक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर असतील तर या कथासंग्रहावर समीक्षक डॉ. महेश खरात हे भाष्य करतील. देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (ता.२३) सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजी नगर येथील देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात होणार आहे. यंदाचा हा पुरस्कार घोरपडे यांना जाहीर झाल्याचे संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य रेखा शेळके, डॉ. निळकंठ डाके, डॉ. गणेश मोहिते, डॉ. प्रेरणा दळवी, डॉ. समिता जाधव, डॉ. पुंडलिक कोलते, डॉ. रमेश औताडे, डॉ. जिजा शिंदे, श्रीमती आशा देशपांडे यांनी कळवले आहे.
यापूर्वी ना. धो. महानोर, भास्कर चंदनशिव, शेषराव मोहिते, इंद्रजीत भालेराव, आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख, कृष्णात खोत, कल्पना दुधाळ, संदीप जगदाळे यासारख्या कृषी संस्कृतीतील महत्वाच्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta