वसंतराव मुळीक; निपाणीत वधू-वर पालक महामेळावा
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात वधू-वरांचे लग्न जमवणे ही सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. आत्याला प्रशिक्षणामुळे मराठा समाजातील युवकांची गोची होत आहे. त्यामुळे समाजातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे. सध्या वधू-वर नोंदणीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक सुरू झाली आहे. त्यापासून दूर राहून प्रत्येकाने सुसंवाद राखला पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केले.
येथील शुभ कार्य वधू -वर सूचक संघ आणि न्याय निवाडा लोकनेता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१०) सकाळी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये मराठा समाज वधू-वर परिचय महामेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुळीक बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर वधू वर सूचक मेळाव्याचे संयोजक दादासाहेब खोत यांनी स्वागत व प्रस्तावित केले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी, सध्याच्या आधुनिक युगात एकमेकांच्या गाठीभेटी कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत वधू -वर परिचय मेळावे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी मनोगत व्यक्त करून समाजात मुलींची संख्या वाढविण्याचे आवाहन केले. सहकारत्न उत्तम पाटील यांनी, मराठा समाज वधु वर मेळाव्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित येण्याचे काम दादासाहेब खोत यांनी केली आहे. यापुढे काळात मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता त्यांना कुटुंबामध्ये मानाचे स्थान देण्याचे आवाहन केले. सहकारात्मक पुरस्कार मिळाल्याबद्दल उत्तम पाटील यांचा वधू -वर सूचक मेळाव्यातर्फे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, दीपक सावंत, निकु पाटील, माजी सभापती विश्वास पाटील, गोपाळ नाईक, उदय देसाई, नवनाथ चव्हाण, दिलीप पठाडे, वकील शितल मेक्कळके, संदीप कामत संदीप चावरेकर बाळासाहेब कदम, विकास कदम, विनोद बल्लारी, विश्वनाथ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.