निपाणी (वार्ता) : कुरली येथे रविवारी आयोजित ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी आणि मर्दानी खेळ संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता सेवानिवृत्त पीडिओ टी. के. जगदेव यांच्या हस्ते ग्रंथ व विज्ञान दिंडीचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सोनाली प्रताप उपाध्यक्ष अमोल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील बस स्थानकापासून संवाद मिरवणुकीने ही ग्रंथ विज्ञान दिंडी काढण्यात आली.
संमेलनानिमित्त कोल्हापूर (गिरगाव) येथील फिरंगोजी शिंदे सामाजिक संस्था संचलित मर्दानी आखाड्याचा कार्यक्रम झाला. त्याचे उद्घाटन वकील संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी दांडपट्टा, तलवार चालविणे, तलवारीने लिंबू कापने, लाठीने हातावर, डोक्यावर नारळ फोडणे, लहान मुलाला पाठीशी बांधून तलवारीने शत्रु वर चढाई करणे, भाला मारणे, जाळी हवेत फिरविणे यासह विविध प्रकारची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यावेळी अरुण काळे वकील दादासाहेब लंबे, बी एस पाटील सिताराम चौगुले यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी भारतीय संस्कृतीवर आधारित आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये पर्यटन स्थळे जुनी वाद्ये, नृत्यकला, वारली पेंट्स अशा विविध प्रकारच्या चित्रांचा समावेश होता.