नगरसेवक विलास गाडीवड्डर; नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यामध्ये शहरातील पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी जैन इरिगेशन आणि केएआयूडईसई अधिकाऱ्यांची नगरपालिकेत बैठक बोलवण्यात आली होती. पण त्यावेळी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा संदर्भात कोणतीच उत्तरे देता आली नव्हती. त्यामुळे मंगळवारी (ता.२६) पुन्हा अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. पण यावेळीही अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे ५ जानेवारीपर्यंत पाणी नियोजनासंदर्भात बैठक न झाल्यास ८ जानेवारीपासून नगरपालिका समोर धरणे सत्याग्रह करण्याचा इशारा नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिला.
गाडीवड्डर म्हणाले, कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तलावात पाणी असूनही चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरवासींयांना पाणीपुरवठा करण्यासाठी अधिकारी अकार्यक्षम ठरले आहेत. केवळ रक्कम गोळा करण्याचे काम अधिकाऱ्याकडून केले जात आहे. सध्याच भविष्यातील पाणी नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी दुसऱ्यांदा बैठक बोलवली. पण त्याच्याकडे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय पाणी योजनेवर होणाऱ्या खर्चाचा तपशीलही संबंधित अधिकाऱ्याकडे उपलब्ध नाही. आता पुढील बैठक तात्काळ घेऊन पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही गाडीवड्डर यांनी दिला.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, शेरू बडेघर, शौकत मनेर, संजय पावले, दीपक सावंत, सुनील शेलार, उपासना गारवे, अनिता पठाडे, दिलीप पठाडे, दत्ता नाईक, अनिस मुल्ला यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.