
कोगनोळी : वेदगंगा नदी काठ बचाव कृती समिती यांच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना मांगुर फाटा वेदगंगा नदीवरील पूल भराव हटवून पिलर पुल बांधण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
पावसाळ्यामध्ये वेदगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने व नदीकाठच्या गावात पाणी येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर नदीकाठी असणाऱ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने शेतीचेही नुकसान होते. सध्या बांधण्यात येणारा भराव पुल यामुळे बॅक वॉटरचा धोका वाढला आहे. यासाठी या ठिकाणी पिलरचा पूल बांधून पाणी जाण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा नदीकाठी असणाऱ्या ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येण्याचा इशारा दिला.
सदर निवेदन जिल्हाधिकारी यांनी स्वीकारून योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी शिवाजी पाटील (बाणगे), लक्ष्मीकांत पाटील (भिवशी),
विजयकुमार शिंत्रे, कुमार माळी, सुदीप वाळके, धीरज पाटील, शिवाजी चौगुले, आनंदा बेलवळे, दिपक पाटील, अजित पाटील, शिवाजी पाटील (कुर्ली) यांच्यासह अन्य शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta