निपाणी (वार्ता) : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील नेहरू चौकात झालेल्या दोन वळुंच्या झुंजीत दुकान व वाहनांचे नुकसान झाले आहे.
वर्षापूर्वी याच ठिकाणी झुंज लागून नागरीक जखमी झाले होते. याशिवाय कोठीवले कॉर्नरजवळ थांबलेल्या महिलेस वळूने धक्का मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या गंभीर घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन वळूंचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नेहरू चौकात झालेल्या दोन वळुंच्या झुंजीत दुकान व वाहनांचे नुकसान झाले आहे. झुंज सुरू असताना नागरीकांनी ही झुंज सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. अखेर एका वळुने दुसऱ्या वळुला जखमी केले. त्यांनतर ही झुंज थांबली. येथील मोकाट जनावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासंबंधी नागरिकानी पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष झाले आहे. अनेक वेळा बाजारासह मुख्यरस्त्यावरच जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. या वारंवार होणाऱ्या घटनांकडे तातडीने लक्ष देऊन नगरपालिकेने ठोस उपाययोजना करण्याची अशी मागणी नागरिकांतून होत आहे.