हुतात्मा स्मारक समिती; नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : येथे झालेल्या तंबाखू उत्पादक शेतकरी आंदोलनात १३ शेतकरी हुतात्मा झाले होते. त्याची दखल संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली होती. त्या घटनेमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ निपाणी येथील कोल्हापूर वेस वरील आंदोलन नगरात त्यांच्या नावाचे स्मृती फलकासह ऐतीहासिक समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. तेथे शेतकरी स्मृती उद्यान निर्माण करावे या मागणीचे निवेदन नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना शेतकरी हुतात्मा स्मारक समितीतर्फे जयराम मिरजकर, प्रा. एन. आय. खोत यांच्या हस्ते देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी शेतकरी आंदोलनातील नेते अंदोलक शेतकरी, त्यांचे वारस व नागरिक हुतात्मा दिन साजरा करीत आले आहेत. त्यामुळे हे ठिकाण शेतक-यांचे प्रेरणास्थान बनले आहे. येथे देशभरातील शेतकरी, नेते वेळोवेळी भेट देत असतात. येथून अनेकदा शेतकरी प्रबोधन यात्रेचा शुभारंभ ही केला जातो.
अशा या अन्नदात्या शेतकऱ्यांचे अजरामर स्मारक या ठिकाणी व्हावे, शेतकरी भवन व्हावे व रिकाम्या जागेत सर्वासाठी शेतकरी स्मृती उद्यान असावे, म्हणून शेतकरी हुतात्मा स्मारक समितीची शासनाकडे स्थापना करण्यात आली आहे.
नगरपालिकेकडे असलेली रिस.नं. १४३ ही जागा शेतकरी हुतात्मा स्मारक समितीला हस्तांतरीत करुन द्यावी. नगरपालिकेच्या २०२४ च्या आर्थीक अंदाजपत्रकात समाधी स्थळ व भवन बांधण्यास आर्थीक तरतुद करावी. स्मारकास झालेला विलंब लक्षात घेता आपण लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जयराम मिरजकर व प्रा.एन.आय. खोत यांच्या हस्ते निवेदन नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रा.सुभाष जोशी, प्रा. डॉ. अच्युत माने, निकु पाटील, प्रा. आनंद संकपाळ, बाबासाहेब मगदूम, विठ्ठल वाघमोडे, बचाराम सांडुगडे, टि.के. पाटील, भाऊसाहेब झिंगे, अय्याज पठाण, सुधाकर माने, सुभाष जोंधळे, डॉ. एस. ए. कुंभार, रवी नाईक, अक्षय तांबेकर, मलगोंडा तावदारे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.