अमर बागेवाडी; १२ हजार रुग्णांची नोंदणी
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेचे संचालक अमित कोरे फॅन क्लब, केएलई जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२५) आय. बागेवाडी महाविद्यालयात मोफत महा महाआरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर होणार आहे. आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक प्रवीण उर्फ अमर बागेवाडी यांनी केले. संस्थेच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
अमर बागेवाडी म्हणाले, शिबिरात केएलई संस्थेचे प्रभाकर कोरे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह २२० आरोग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात हृदयविकार, मूत्राशय, न्यूरोपॅथी, नेत्रोपचार, फुफ्फुस, हिप-जॉइंट, कान, नाक, घसा, थायरॉईड, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, शारीरिक उपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी यासह सर्व आजारांची माहिती दिली जाणार आहे.
शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांना बेळगावच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्याची संधीही मिळणार आहे. याशिवाय मोफत साखर, हिमोग्लोबिन, कॅन्सर, बीपी, ईसीजी आणि इको चेकअप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरार्थींसाठी वाहन आणि जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
जी.आय. बागेवाडी महाविद्यालयातही नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुकांनी कॉलेजला भेट देऊन त्यांच्या तपशीलासह नोंदणी करावी. स्वयंसेवकांनी १०२ गावांमध्ये शिबिराची जनजागृती केली आहे. आतापर्यंत १२ हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. आयुष्मान कार्ड असेल तर पाच लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही बागेवाडी यांनी केले आहे.
प्रा. डॉ. श्रीपती रायमाने यांनी स्वागत केले. यावेळी संचालक मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र शेट्टी, समीर बागेवाडी, आनंद बोरगल्ले, संजय पाटील, राजू हादीमनी, डॉ. आल्लमप्रभू, प्राचार्य एम. एम. हुरळी, एस. एस. कुट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.