
रयत संघटनेचा इशारा; तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने चार-पाच महिन्यापूर्वीच चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळालेला नाही. त्याचप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात. जनावरांच्या चारा, पाण्याची १८ मार्चपूर्वी सोय न केल्यास बेळकुड गेट येथे राज्य महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला.
तहसीलदार चिदंबर कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी पोवार बोलत होते.
सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप एक रुपयाचा निधी आलेला नाही. उन्हाळा सुरू होताच बेळकुड, बंबलवाड, बिदरोळी, हत्तरवाट येथे चारा, पाण्याची गंभीर स्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन बँकांना शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करू नये, अशी सूचना दिली आहे. दुष्काळ निवारणासाठी जिल्ह्याला ५० कोटीचा निधी आला आहे. पण दुष्काळी नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याची अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली.
यावेळी राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी, तालुका अध्यक्ष बसवराज पाश्चापूरे, हरित सेना तालुका अध्यक्ष आनंद पाश्चापुरे, मारुती दोडमणी, गजानन कोट्टपगोळ, अभिषेक पाच्छापूरे, रामचंद्र माळी, शंकर मुत्नाळे, सागर इदेनाळ यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta