गाळप आणि साखर उत्पादनात जवाहर कारखाना आघाडीवर
कोगनोळी : नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे.
जिल्ह्यातील अथर्व इंटर ट्रेड, हमिदवाडा सदाशिवराव मंडलिक, गडहिंग्लज, बांबवडे, तांबाळे, संताजी घोरपडे, इको केन चंदगड या सात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे.
१४ लाख ५९ हजार १०० मे. टनांचे गाळप करुन हुपरी-यळगूड येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना पहिल्या क्रमांकावर असून १२.९३ टक्के सरासरी साखर उतारा मिळवून दालमिया शुगर साखर कारखाना उताऱ्यात पहिल्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत १ कोटी ४७ लाख ९ हजार ७५७ मे. टनांचे गाळप झाले आहे.
गळीत हंगामाच्या प्रारंभी सरासरी तुलनेत कमी पडलेला पाऊस यामुळे ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होणार असा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु परतीच्या पावसाने ऊस उत्पादनात झालेली वाढ यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला. उष्णतेची तीव्रता वाढत असताना साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. जवाहर साखर कारखान्याने १४ लाख ५९ हजार १०० मे. टन गाळप करुन १७ लाख ५७ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन करुन गाळपात व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. तर दत्त शिरोळ साखर कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. दालमिया शुगर आसुर्ले-पोर्ले या साखर कारखान्याने १२.९३ टक्के सरासरी साखर उतारा मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर कुंभी कासारी साखर कारखाना साखर उताऱ्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत १ कोटी ४७ लाख ९ हजार ७५७ मे. टनांचे गाळप होऊन १ कोटी ७१ लाख ५८ हजार ६४८ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.७३ टक्के इतका आहे.