बेळगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले जाहिराती फलक, भगव्या पताका, भगवे ध्वज त्याचप्रमाणे इतर जाती-धर्मांचे ध्वज काढण्यात आले आहेत. मात्र ही कारवाई करत असताना प्रशासनाने मात्र लाल पिवळ्या ध्वजाला झुकते माप दिले आहे. त्यामुळे लाल-पिवळ्या ध्वजाला आचारसंहितेची नियमावली लागू पडत नाहीत की काय असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
आचारसंहितेचे कारण देत इतर धर्मांच्या ध्वजासह हिंदू धर्मीयांचा भगवा ध्वज, भगव्या पताका काढण्याचे काम पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र शहरात ठीकठिकाणी असलेल्या लाल- पिवळ्या ध्वजाकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आढळून येत आहे.
आचारसंहिता लागून एक आठवडा उलटत आला तरी गोवावेस येथील खानापूर रोडवरील दुभाजकांच्या पथदिपांवर लाल पिवळे फडकत असताना दिसत आहेत. लाल- पिवळ्या ध्वजापाई कर्नाटक शासन भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेची जणू खिल्ली उडवत असल्याचे दिसून येत आहे. एरवी आचारसंहितेचे काटेकोर पालन करणाऱ्या प्रशासनाकडून लाल पिवळ्यालाच “अभय” का असा सवाल जागरूक नागरिक करत आहेत.