निपाणी (वार्ता) : येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद साळुंखे यांना राष्ट्रीय मराठा पक्षातर्फे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्याला श्यामसुंदर गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबतचे पत्र कर्नाटक राज्य राष्ट्रीय मराठा पक्षाचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी दिल्याचे विनोद साळुंखे यांनी सांगितले. बुधवारी (ता.३) दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
विनोद साळुंखे म्हणाले, मराठा समाज व मराठी भाषिकांना विधानसभा, लोकसभा निवढणूकामध्ये योग्य स्थान दिले जात नाही. बऱ्याचवेळा आरक्षणाची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. यापूर्वी सर्वच समाजाच्या उमेदवारांना मराठा समाजाने मदत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अनुसरून समाजाची वाटचाल करणार आहे. आपल्या उमेदवारीला मराठा समाजासह इतर समाजाचाही प्रतिसाद मिळत आहे.
उद्योग, व्यवसाय उभारून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आपल्याला उमेदवारी मिळाली आहे. त्यातून समाजाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वीच आरक्षण दिले असते तर आता बंडखोरी करण्याची वेळ आली नसती. मराठ्यांच्या अस्तित्व टिकवण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. यावेळी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे विनोदी साळुंखे यांनी सांगितले.