२४ पाणी योजनेप्रमाणे बिल आकारू नये : सर्वच प्रभागात समान कामे
निपाणी (वार्ता) : येथील निपाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २५) नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तब्बल सहा महिन्यांनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत कोणताही गोंधळ न होता विविध १२ विषयावर सकारात्मक चर्चा झाली. २४ तास पाणी योजनेचे पाणी अद्याप काही ठिकाणी सुरू न झाल्याने व हवेमुळे बिल जादा येत असल्याने पूर्वीप्रमाणेच बिले अकारण्याबाबत चर्चा झाली.
यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषयांचे प्रोसेडींग वाचण्यात आले. त्यानंतर जुलै ते डिसेंबर अखेरपर्यंतच्या जमा – खर्चाला मंजुरी, एका वर्षाकरीता स्थायीसमितीची निवड करणे, बाजार करावर चर्चा करून निर्णय घेणे, व्यापारी गाळ्यांचा लिलाव, तालुका क्रीडांगणासाठी नांगनूर हद्दीतील १० एकर जागा मैदान विकासासाठी युवा व क्रीडा खात्याकडे सुपूर्द करणे, महिला आणि बाल विकास खात्याच्या कार्यालयाला जागा देण्याबद्दल चर्चा करणे, कूपनलिका दुरुस्तीसाठी निविदा मागविणे, नगरपालिकेला वाहने भाड्याने देण्यासाठी निविदा मंजूर करणे आदी विषयावर सभेत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
नगराध्यक्षांनी मंजूर केलेल्या विविध कामांना मंजूरी देणे, नगरसेवकांनी सुचविलेल्या विविध कामावर चर्चा करून निर्णय घेणे, शहरातील विविध मंडळांकडून पालिकेची जागा मागणीसाठी आलेल्या अर्जावर विचार करून निर्णय घेणे या विषयांचाही चर्चेत समावेश होता.
विरोधी गटाचे नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी, दोन वर्षापासून कोरोनामुळे आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे बाजार कर लावू नये. व्यापारी गाळ्यांच्या लिलावावेळी जुन्या व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे. आंबेडकर नगरातील तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण करावे, यासह विविध मागण्या केल्या. नगरसेवक डॉ. जसराज गिरे यांनी, २४ तास पाणी योजनेची भरमसाठ बिले येत असून पूर्वीप्रमाणे बिलांची आकारणी व्हावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त यासह शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मागणी केली. नगरसेवक शेरु बडेकर यांनी, आपल्या प्रभागात विकासासाठी निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे अनेक गैरसोय आहेत. नवीन सुसज्जित कत्तलखाना केलास परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहणार असल्याचे सांगितले. नगरसेविका अनिता पठाडे यांनी, डाऊनलोड हद्दीत होणारा स्टेडियमला माजी आमदार बाळासाहेब शिंदे यांचे नाव देण्याचीसूचना केली.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि उपनगरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यांनी राजा शिवछत्रपती संस्कृती भवनासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. या कामाची पूर्तता होताच शहरातील विविध चौक व पुतळ्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. सध्या कोटी रुपये मंजूर झाला असून त्यातून सर्व प्रभागात महत्त्वाची कामे करून शहर आणि उपनगरांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक रवींद्र शिंदे, शौकात मनेर, संजय पावले, सोनल कोठडिया, दत्ता जोत्रे, दत्ता नाईक, माजी सभापती सद्दाम नगरजी, संतोष सांगावकर, यांच्यासह नगरसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी पालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी स्वागत केले. तर उपनगराध्यक्ष नीता बागडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta