निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकावरील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौकाजवळ असलेल्या एका कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजता सुमारास घडली. या घटनेमध्ये निशिकांत बागडे यांच्या दुकानातील प्लास्टिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे परिसरातील आग आटोक्यात आणणे शक्य झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गेल्या चार-पाच वर्षांपासून निशिकांत बागडे यांचे धर्मवीर संभाजी चौक परिसरात कटलरी दुकान कार्यरत आहे. बगाडे हे दरवर्षी हंगामानुसार विविध साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे आपल्या दुकानात त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने त्यांच्या दुकानाला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दुकाना बाहेर येऊन मोठा आरडाओरडा केला. शिवाय हेस्कॉमला याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे परिसरातील हॉटेल व इतर दुकाने बचावले आहेत.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी आणि इस्कॉनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी अग्निशामक दलाच्या बंबाला पाचारण केल्यानंतर त्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शेजारील पथदीप सुरू ठेवल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले. या घटनेमध्ये दुकानातील प्लास्टिकचे इतर सर्व वस्तू जळून खाक झाल्याने सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.