हुतात्मा स्मारक समिती : नगरपालिकेला निवेदन
निपाणी (वार्ता) : येथील आंदोलन नगरात तंबाखू पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी ४० वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये १३ शेतकरी हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्याची मागणी नगरपालिकेसह लोकप्रतिनिधीकडे स्मारक समितीने केली आहे. याबाबत निवेदन देऊनही निधी न मिळाल्याने नगरपालिकेने ५ सप्टेंबर पर्यंत हा निधी उपलब्ध करावा. अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी हुतात्मा स्मारक समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी नगर पालिका आयुक्त दीपक हार्दिक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, निपाणी भागातील तंबाखू हे मुख्य पीक आहे. या पिकासाठी उत्पादन खर्चही मोठा आहे. पण त्यामानाने दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यामुळे महामार्ग रोखून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये १३ शेतकरी हुतात्मा झाले. त्यांचे स्मरण व प्रेरणा राहावी, यासाठी स्मारक बांधण्याचा निर्धार स्मारक समितीने केला आहे. त्यामुळे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊन हुतात्मा शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एन. आय. खोत यांच्या हस्ते नगरपालिका आयुक्त दीपक हरदी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून नगरपालिका बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्मारक समिती अध्यक्ष प्रा. डॉ. अच्युत माने, विठ्ठल वाघमोडे, प्रा. आनंद संकपाळ, मधुकर पाटील, सुधाकर सोनाळकर, टि. के. पाटील, भाऊसाहेब झिनगे, अय्याज पठाण, बाबासाहेब मगदूम, सुधाकर माने, संदीप चावरेकर, दत्तात्रय जोत्रे, रवींद्र श्रीखंडे यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta