निपाणी (वार्ता) : राजकीय नेत्यांनी अहंकार न बाळगता सर्वसामान्यांची कामे करावीत. आपण पालकमंत्र्यांची बेळगाव येथे भेट घेऊन काँग्रेस पक्ष वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्याही कामासाठी आपल्याशी थेट संपर्क ठेवण्याचे सांगितले. मात्र नगरपालिकेत काँग्रेस पुरस्कृत आघाडी करण्याच्या आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारी(ता.२९) दुपारी 1 वाजेपर्यंत निर्णय घेणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिली.
मंगळवारी निपाणीत आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
गाडीवड्डर म्हणाले, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते असलेल्या रमेश जारकीहोळी यांनी उत्तम पाटील यांना उमेदवारीसाठी झुकते माप दिले होते. तरीही सर्व नगरसेवक आणि स्थानिक नेते व पक्षश्रेष्ठींनी पाठिंबा दिल्याने काकासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला. यानंतर खासदार, मंत्रीही भाजपचे झाले. नगरपालिका भाजपकडे गेली. तरीही सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही बजावली.
२०२३ च्या निवडणुकी दरम्यान काकासाहेब पाटील यांना थांबण्याची आणि उत्तम पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्याची मागणी आम्ही केली. मात्र स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी आम्ही उत्तम पाटील यांना अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक उत्तम पाटील यांनी प्रा. सुभाष जोशी व इतरांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची उमेदवारी आणली. याची कोणतीच कल्पना आम्हाला नव्हती. याबाबत विचारणा केली असता मराठा मतदान मिळायचे असेल तर शरद पवार गटाची उमेदवारी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. केवळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा आधार घ्यायचा असे ठरले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये येणे गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुकीत उत्तम पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला तरी त्यानंतर आपण सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे जाऊन उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा काँग्रेस प्रवाहात सामील करून घेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्यांनी ग्रीन सिग्नल दिला. मात्र उत्तम पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शहराच्या विकासासाठी काही योजना आपण घेऊन संबंधित खात्याचे मंत्र्यांकडे गेलो. त्यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी सहकार्य केले. पण उत्तम पाटील आले नाहीत. त्यामुळे त्यांची साथ सोडून काकासाहेब पाटील व पालकमंत्री यांचे नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करत आहोत. नगरपालिकेत सत्तेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय पालकमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारी निवडणुकीपूर्वी एक तास आधी घेणार आहोत, असे सांगितले. त्यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, सुनिता गाडीवड्डर उपस्थित होते.