तहसीलदार प्रवीण कारंडे; निपाणी शांतता कमिटीची बैठक
निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. गणेशाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करावे. कायद्याच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते.
चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर म्हणाले, दर्शन रांग अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी महिला पुरुष यांना वेगळी व्यवस्था करावी. मंडळाच्या किमान पाच पदाधिकाऱ्यांनी तर 24 तास मंडपात राहणे आवश्यक आहे. मंडपामुळे रहदारीला अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी. रात्री दहा वाजता विसर्जन मिरवणूक संपवावी. मूर्ती विसर्जना ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी.
पोलीस निरीक्षक बी.एस तलवार म्हणाले, गणेश मंडपामध्ये हेस्कॉम, महसूल अधिकारी अग्निशामक दल सह विविध अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक लावणे आवश्यक आहे. नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास तात्काळ कारवाई होणार आहे. ध्वनी प्रदूषण व पर्यावरणाला हानी होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. मूर्तीची उंची जास्तीत जास्त तीन फुटापेक्षा पेक्षा जास्त असू नये. ठरलेल्या दिवशीच शांततेने वेळेत मिरवणुका संपवून सौहार्दता जपण्याचे आवाहन केले.
यावेळी ॲड. अमर शिंत्रे,विठ्ठल वाघमोडे, काशीमखान पठाण, नंदकुमार कांबळे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना व मागण्या केल्या. डॉल्बी लावण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार याबाबतची माहिती मंडळापर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे गौरव यांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक रमेश पवार, उपनिरीक्षका उमादेवी, शिवराज नायकवडी, अग्निशामक दलाचे अधिकारी वाय. बी. कौजलगी, नगरपालिकेचे अधिकारी संपतराव कुरणे, विनायक जाधव तालुका पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी सुदीप चौगुले यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व शहर आणि ग्रामीण भागातील मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.