संभाजीनगर मधील नागरिकांची मागणी; नगराध्यक्षांना निवेदन
निपाणी (वार्ता) : उपनगरातील मुरगुड रोड ते शिंदे नगर जोडणाऱ्या रस्त्यामधोमध असणारे अतिक्रमण हटवून रस्ता निर्माण करण्याच्या मागणीचे निवेदन संभाजी नगर, शिंदे नगर परिसरातील नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.३०) नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांना दिले. ८ जानेवारीपर्यंत अतिक्रमण काढून रस्ता न केल्यास ९ जानेवारीपासून नगरपालिकेसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
निवेदनातील माहिती अशी, गेल्या २० वर्षांपासून संभाजीनगर, शिंदेनगर परिसरातील रहिवासी मुरगुड रोड ते शिंदे नगर जोडणारा रस्त्यावरून ये-जा करतात. सदर रस्त्याच्या मधोमध एक घर बांधण्यात आले आहे. मध्यंतरी लोकप्रतिनिधींनी सदर रहिवाश्यांना पर्यायी जागा म्हणून रि.स. क्र. ८९/२ मधील जागेचे हक्कपत्र दिले आहे. मात्र त्याची अद्यापही पूर्तता झालेली नाही.
रस्त्यावरील अतिक्रमणामुळे जुने संभाजीनगर, हरीओम नगर ओमगणेश नगर, शिंदे नगर येथील रहिवाशांना ये-जा करणे कठीण होत आहे. हे अतिक्रमण काढून संबंधित कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्याबाबत नगरपालिकेला बऱ्याचदा निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आठवडाभरात अतिक्रमण काढून रस्ता न केल्यास ९ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांनी निवेदन स्वीकारून, नगरपालिका पदाधिकाऱ्यांसमवेत अतिक्रमण स्थळी भेट देऊन योग्य निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
यावेळी अजित बक्कन्नावर, विनायक माने, सोमनाथ वरदाई, उमेश गंथडे, पिराजी कदम, चंद्रकांत कांबळे, रोहित प्रभावळे, सुरज चौगुले, बसवराज हत्तरकी, चांद हवालदार, सचिन जगताप, ज्योतीराम बोंगार्डे, प्रकाश चव्हाण, पांडुरंग रावण, आनंद बाडकर, नेमिनाथ माने, भीमराव सुतार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.