
प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत पत्रकार दिन
निपाणी (वार्ता) : पत्रकार हा समाजातील आरसा असतो. त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बातमी मागील बातमी काढण्याची आता गरज निर्माण झाली आहे. देशात वाढलेल्या राजकतेवर अंकुश ठेवण्यासाठी आता लेखणी करावी लागेल. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रा. डॉ. माने म्हणाले, अलीकडच्या काळात हिंसा अराजकता वाढली आहे. त्याबाबत पत्रकारांनी आपल्या लेखणीतून जागृती करावी. शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मारकाचे काम ४० वर्षापासून रखडले आहे. सामान्यामुळे परिवर्तन होत असून सामान्यांचा आवाज पत्रकारांनी मोठा केला पाहिजे. निपाणी हे शहर परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र असून त्याच जबाबदारीने पत्रकारांनी काम करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी, समाजामध्ये जागृती करण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळे त्यांना आपले सहकार्य असल्याचे सांगितले. चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांनी, प्रत्येक वाहनधारकांनी वाहन चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतःसह वाहनांचा विमा उतरविण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष सोनल कोठडीया यांनी, पत्रकारांच्या लेखणीतून चांगल्या वाईट प्रवृत्तीचे चित्रण झाले पाहिजे. प्रशासक म्हणून पत्रकारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी राजेश शेडगे, रंगराव बन्ने, उद्योजक उदय पाटील, प्राचार्य स्नेहा घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. डॉ. अच्युत माने यांना नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार झाला. पत्रकार संघातर्फे सर्व सदस्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सभापती डॉ. जसराज गिरे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, दत्तगुरु संस्थेचे सचिन खोत, कोल्हापूर येथील उद्योजक उदय पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, राजेश कोठडीया, उपनिरीक्षक उमादेवी यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते. कलावती मेनसे यांनी सूत्रसंचालन तर पत्रकार संघाचे सेक्रेटरी सोमनाथ खोत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta