निपाणी (वार्ता) : नगरपालिकेच्या नगरोत्थान योजनेतून येथील धर्मवीर छत्रपती न्यु संभाजीनगर परिसरातील रस्ते, गटारी आणि सार्वजनिक शौचालयांची कामे करावीत, अशी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळाने थेट रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेतला.
भवानी चौक येथील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून त्याची दुरुस्ती करण्यात आली. गटारीतील सांडपाणी निचरा न झाल्याने दुर्गंधी पसरून रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नगरातील रस्ते, गटारी व शौचालये पूर्णपणे निकृष्ट स्थितीत आहेत.
सन १९९३ साली स्थापन झालेल्या या वसाहतीतील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी असून, पालिकेकडून याबाबत आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे तरुण मंडळाने स्वतः पुढाकार घेत रस्त्यांची डागडुजी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, “नगरातील रस्ते, गटारी आणि शौचालयांची कामे नगरोत्थान योजनेतून तात्काळ करण्यात यावीत. अन्यथा मंडळ आपल्या पद्धतीने प्रश्न मार्गी लावेल.”
या उपक्रमात अजय लोहार, अदित्य केसरकर, गजानन खापे, दिगंबर पारळे, अशोक हजारे, सुरज चौगुले, आकाश रावण, उस्मान मुल्ला, मुबारक अरब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta