निपाणी (वार्ता) : निपाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर लोकायुक्त विभागाने कारवाई करून १० हजाराची लाच घेताना निपाणीतील कामगार कार्यालय निरीक्षक नागेश कळसण्णावर यांना रंगेहाथ पकडले. त्यांना लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
लोकायुक्त अधिकाऱ्यानी दिलेली माहिती अशी, बोरगांव येथील पानमसाला कारखान्याचे मालक राजू पाच्छापुरे यांच्या कारखान्यात असणाऱ्या कामगारांच्या कागदपत्रात कांही त्रूटी आढळून आल्या होत्या. याप्रकरणी राजू पाच्छापुरे यांना कामगार निरीक्षक नागेश कळसण्णावर यांनी नोटीस देवून योग्य माहिती व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. अन्यथा या प्रकरणी १० हजाराची मागणी केली होती. याबाबत राजू पाच्छापुरे यांनी लोकायुक्त विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार आज लोकायुक्त विभागाचे डीवायएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश एडहळ्ळी, संगमेश होसमणी यांच्यासह आलेल्या अधिकाऱ्यांनी निपाणी येथील मानें प्लॉट येथील विवेकानंद कॉलनीमध्ये असणान्या निपाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर सापळा लावला होता. कार्यालयातील इतर कर्मचारी बाहेर गेल्यानंतर राजू पाच्छापुरे हे सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात आले. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली. रितसर पंचनामा करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
निपाणीत तहसिलदार कार्यालयातील उपतसिलदार असलेल्या बोंगाळे व सत्ती यांच्या कारवाईनंतर पुन्हा एखदा कामगार निरीक्षक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दापाश झाल्याने निपाणी सरकारी कार्यालयात होणार भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कारवाईमुळे अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta