

युद्ध पातळीवर काम सुरू, आधुनिक मशीनद्वारे ५० फूट पायलिंग
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम निपाणी परिसरात सुरू आहे. मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पूल पिलरचाच व्हावा, यासाठी सीमाभागातील कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी लढा दिला होता. याची दखल घेत नदीपासून उत्तरेला एक हजार फूट (३०० मीटर) पिलर उभारून पूल बांधण्याचा आदेश राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाने दिला. यासाठी सुमारे ७० कोटी जादा निधीचीही तरतूद केली आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यापूर्वीच पिलर निर्माण होणार असल्याने शेतकरी व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सहा महिन्यांत पश्चिमेकडील सेवा रस्त्याचे पिलर उभे केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यानंतर पूर्व बाजूच्या पिलर उभारणीला प्रारंभ होणार आहे. महामार्गावर घातलेल्या भरावानंतर पुन्हा १० ते १२ फुटांपर्यंत भराव करण्यात येणार होता. त्यामुळे पुराने अनेक गावांना धोका पोहोचण्यची भीती होती.
धोक्याची गंभीर दखल घेऊन कर्नाटक महाराष्ट्रातील वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. त्याच्या माध्यमातून करून सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यानेतृत्वाखाली शरद पवार यांच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. शिवाय माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांनीही गडकरींची भेट घेतली होती. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लग्नाच्या मार्गावर आहे. यासाठी के. डी. पाटील, शेखर सावंत, शिवाजी पाटील (बानगे), दिगंबर अस्वले (मळगे), लक्ष्मीकांत पाटील (भिवशी) यांच्यासह कृती समितीतील पदाधिकारी कार्यकर्ते या कामाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहेत.
——————————————————————–
‘आधुनिक मशिनीरीद्वारे सुमारे ४० ते ५० फुटांपर्यंत खोदून पायलिंग होत आहे. ८२ फूट अंतरावर एक पिलर असे एका बाजूला १३ पिलर असून, एकूण ५२ पिलर उभे राहणार आहेत. पिलर उभे झाल्यानंतर यापूर्वी घातलेला भरावही काढले जाणार आहे.’
– के. गुहान, वरिष्ठ अभियंते, महामार्ग निर्माण प्राधिकरण
Belgaum Varta Belgaum Varta