
कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी ; निपाणी तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. पण राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराला हा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहत आहे. बेळगाव हे शहर जिल्ह्याच्या कामासाठी या भागातील नागरिकांना दूर आहे. त्यामुळे चिक्कोडीला जिल्ह्याचा दर्जा द्यावा. त्यामुळे या भागातील नागरिकांची सोय होणार आहे. याशिवाय डोंगराळ भागातील शेंडूर, गोंदूकुप्पी तवंदी, शिरगुप्पी, यरनाळ या गावांना स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, चिक्कोडी शहराला जिल्ह्याचा दर्जा देणे योग्य आहे. तरीही चालढकल करणे चुकीचे आहे. जिल्हा मागणीसाठी अनेक संघटना एकवटले आहेत. त्यामुळे सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन हा प्रश्न मिटवणे गरजेचे आहे. याशिवाय दरवर्षी जानेवारीपासूनच डोंगराळ भागातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यासाठी नदीपासून स्वतंत्र पाणी योजना राबवून नागरिकांची तहान भागवावी. ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान २००० रुपये आधारभूत किंमत द्यावी. साखर कारखान्यांनी डिजिटल वजन काटा बसून तात्काळ त्याच्या पावत्या शेतकऱ्यांना मिळाव्यात. त्याची पाणीपुरवठ्यासाठी १२ तास थ्री फेज पुरवठा करावा. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
शेतजमिनींमध्ये, वन्य प्राण्यांकडून पिकांचे आणि शेतकऱ्यांचे वारंवार नुकसान होते. त्यामुळे संरक्षक भिंती आणि कुंपण घालून द्यावे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने किमान ५० लाख रुपये भरपाई देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
तहसीलदार सुरेश मुंजे यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याची आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे सर्जेराव हेगडे, बाळासाहेब ऐवाळे, अशोक क्षीरसागर, सिद्धाप्पा मिरजे, बाबासाहेब पाटील, महादेव बरगाले, आनंद गायकवाड यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—
Belgaum Varta Belgaum Varta