निपाणी (वार्ता) : येथील बसस्थानक आवारात असलेल्या स्वच्छतागृहासह दुचाकी पार्किंगसाठी संबंधित कंत्राटदार प्रवासी व नागरिकांची लूट करत असल्याची तक्रार येथील ४ जे आर मानवाधिकार संघटनेने परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. याशिवाय याबाबतचे निवेदनही आगार प्रमुखांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, शहर व परिसरातील अनेक नोकरदार, कामगार, व्यवसायिक, आणि प्रवासी कामाच्या निमित्ताने दररोज बेळगाव, कोल्हापूर व इतर ठिकाणी ये जा करतात. यावेळी बहुतांश नागरिक स्थानकात दुचाकी वाहने पार्किंग करून सायंकाळी घेऊन जातात. तर काही प्रवासी सार्वजनिक स्वच्छतागृह व इतर वाहने पार्किंग करत आहेत. स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने पार्किंग केल्यास २०० रुपयांचा दंड आहे. हा नियम धाब्यावर बसवून बिनधास्त पार्किंग केले जात असेल तर बस स्थानकात ‘पे पार्किंग’च्या नावाखाली रक्कम का वसुली केली जात आहे.
राज्यसरकारने दर महिन्याला महिलांना २ हजार रक्कम दिली जात आहे. अशा परिस्थितीत महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहासाठी १ रुपये शुल्क असताना कंत्राटदार व तेथील कर्मचारी महिलांकडून ५ तर पुरुषाकडून १० रूपयाची वसुली करत आहेत. याबाबत आगारातील अधिकाऱ्यांशी मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून पत्रही दिले आहे. पण या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने प्रवासी नागरिकातून संताप व्यक्त केला जात असल्याचे मानवाधिकार संघटनेचे सदस्य अशोक खांडेकर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta