
दुपारनंतर आंघोळीसाठी नदी विहिरीवर गर्दी; आकर्षक टोप्या आणि मुखवट्यांचे आकर्षण
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर परिसरात सोमवारी (ता.८) गल्लीबोळासह चौका चौकात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात आली. रंगपंचमी निमित्ताने आबालवृद्धांनी सप्तरंगांची उधळण केली. रंगपंचमीचे औचित्य साधून शहर उपनगरांतील चौकाचौकांत असलेल्या सार्वजनिक मंडळाच्या कार्यकत्यासह उपनगरे, कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ध्वनी यंत्रणा लावून मराठी, हिंदी गीतांवर ठेका धरत नाचण्याचा आनंद लुटला. यंदा तरुणाईसह युवती आणि महिलांनी मोठ्या जल्लोषात रंगपंचमीचा आनंद लुटला.
शहर ग्रामीण भाग आणि उपनगरांतील चौकाचौकांत रंगपंचमी साजरी करण्यात आल्याने परिसरातील रस्ते विविध रंगांनी न्हाऊन निघाले होते. रंगपंचमी दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारून रंगपंचमी साजरी केल्याने अधिक उधाण आल्याचे दिसून आले. रंगपंचमी निमित्ताने बालगोपाळांनी डोक्यावर आकर्षक टोप्या तसेच चेहऱ्यावर आकर्षक मुखवटे परिधान केले होते. तर काहींनी विविध रंगांनी आपल्या चेहरे रंगवले होते. परिसरातील मंडळातर्फे पाण्याचे शॉवर लावण्यात आले होते. रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद होती. पण पिचकारी आणि रंगाचे दुकाने सकाळी सात वाजल्यापासूनच उघडण्यात आली होती. त्यामुळे दुपारपर्यंत रंगाच्या खरेदीसाठी नागरिकासह युवकांनी गर्दी केली होती.
चिककोडीचे उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल बी.एस तळवार यांच्या नेतृत्वाखाली निपाणी ग्रामीण, शहर आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता रंगपंचमी उत्साहाने साजरी झाली. दुपारपर्यंत परिसरात रंगपंचमीचा जल्लोष सुरूच होता.
——————————————————————–
नदी, विहिरीवर गर्दी
ग्रामीण भागातही जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यामध्ये अनेक कुटुंबीयांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. रंग खेळून झाल्यानंतर बहुतेकांनी नजीकच्या विहिरींबरोबरच वेदगंगा नदी घाटावर, जत्राट, यमगर्णी, बुदिहाळ, सिदनाळ, चिखलीतील नदी घाटावर अंघोळीसाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे तरुणाईने या खेळाचा आनंद लुटताना दुचाकींचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन पुंगळ्या काढून आनंद लुटला. त्यामुळे सर्वत्र दिवसभर दुचाकींची रेलचेल सुरूच होती.
Belgaum Varta Belgaum Varta