
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बसस्थानकावर चिक्कोडी रोडवर असलेल्या तीन व्यापारी गाळ्यना शुक्रवारी (ता.१३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या दुर्घटनेत तीन व्यापारी संकुलातील सुमारे पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासुद, प्रथमेश जासूद व सहकार्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. त्यामुळे परिसरातील अनेक व्यवसायिकांचे गाळे आगीपासून बचावली आहेत.
येथील चिक्कोडी रोडवर जासूद कॉम्प्लेक्स मध्ये बऱ्याच वर्षापासून आठ दहा गाळे व्यवसायिक कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ९ वाजता सर्वच व्यवसायिनी आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. रात्री अकरा वाजता सुमारस तौसीफ पकाली यांच्या ज्यूस सेंटर मधून धुर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ या घटनेची माहिती अग्निशामक दलाल देण्यात आली. तातडीने अग्निशामन दलाच्या जवानांनी वाहनासह घटनास्थळी गाव घेतली. पाण्याच्या माऱ्यामुळे ही आग आटोक्यात आली. अन्यथा परिसरातील दुकानांनाही मोठा धोका झाला असता.
या घटनेमध्ये पकाली यांच्या ज्यूस सेंटरसह पट्टणकुडी येथील विनायक कांबळे यांच्या शाहू गुळाच्या चहाच्या दुकानाचेही सुमारे ७५ हजार रुपये आणि राजू दिल्ली वाला यांच्या सलून दुकानाचे ५० हजार रुपये असे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान शनिवारी (ता.१४) दुपारी बारा वाजता आमदार शशिकला जोल्ले यांनी आग लागलेल्या गाळ्याच्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. त्यांनी तहसीलदार सुरेश मुंजे, हेस्कॉम अभियंते सुरेश तहसीलदार, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून पंचनामा करण्यासह नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याच्या सूचना केल्या.
माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, माजी सभापती निपाणी भाजपा अध्यक्ष राजु गुंदेशा, शिवम जासूद, पुरुषोत्तम तासगावकर, विजय टवळे, अभिजीत मुदकुडे, सुरज खवरे, संजय सूर्यवंशी, सुजाता कदम, रवींद्र कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————————
येथील परमणे येथील ट्रान्सफार्मर वरील पडत असलेला लोड येथील बस स्थानकाजवळील ट्रान्सफार्मरवर जोडण्यात आला आहे. त्यामुळे स्थानकाजवळील ट्रान्सफार्मरवर वारंवार विजेच्या ठिणग्या उडण्यासह तासनतास वीसपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ट्रान्सफार्मर वरील लोड कमी करण्याची मागणी आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडे हरीष जासूद यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta