Friday , June 26 2026
Breaking News

‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत गायल्याबद्दल मराठी युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी महाराष्ट्राने हस्तक्षेप करावे; युवा समितीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत गायल्याप्रकरणी मराठी भाषिक युवकांवर दाखल करण्यात आलेल्या पोलीस गुन्ह्यांविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तसेच अल्पसंख्यांक आयोगाला निवेदन पाठविण्यात आले आहे.

रंगपंचमी तसेच भारताच्या विश्वचषक विजयानंतर आनंदोत्सव साजरा करताना काही युवकांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्यगीत गायले. या घटनेनंतर काही कन्नड संघटनांनी तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांनी मराठी भाषिक युवकांवर गुन्हे नोंदवले. ही कारवाई अन्यायकारक असून भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सांस्कृतिक अधिकारांच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संविधानाच्या कलम १९(१)(अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तर कलम २९(१) नुसार कोणत्याही समाजाला आपली भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत मराठी भाषा व संस्कृतीचे प्रतीक असून ते गायल्यामुळे गुन्हा दाखल करणे लोकशाही मूल्यांना बाधा आणणारे असल्याचे समितीने म्हटले आहे.

तसेच काही कन्नड संघटनांकडून मराठी भाषिकांना ‘राष्ट्रद्रोही’ व ‘राज्यद्रोही’ असे संबोधून बदनामी केली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या भडक वक्तव्यांमुळे भाषिक वैमनस्य वाढण्याची शक्यता असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारशी चर्चा करावी, मराठी युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना घटनात्मक व कायदेशीर संरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

Spread the love  बेळगाव : 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *