सामान्यांच्या गॅसवर डल्ला मारणाऱ्यावर कारवाईची मागणी
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी आणि निपाणी परिसरातील घरगुती गॅस वितरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी नियमानुसार गॅस बुकिंग करूनही ८ ते १० दिवस उलटून गेले तरी त्यांना गॅस सिलिंडर मिळत नाही. डीसीए किंवा इतर कारणे देत ग्राहकांना वारंवार अडवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्याबाबत संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत स्वयंपाक गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे. गुरुवारी (ता.२६) आयोजित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर हॉटेल, धाबे तसेच व्यावसायिक वाहनधारकांना १५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढीव दराने खुलेआम विकले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. जेंव्हा सामान्य ग्राहकांसाठी गॅसचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते, तेंव्हा काळ्या बाजारात उपलब्ध होणारा हा गॅस नेमका कुठून येतो, हा अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रश्न निर्माण होतो.
यावरून असे स्पष्ट होते की, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे सिलेंडर काही एजन्सी किंवा संबंधित घटकांकडून वळवून काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. ही बाब केवळ बेकायदेशीर नसून जनतेच्या मूलभूत गरजांवर घाला घालणारी आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचे मौन देखील नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण करणारी आहे. तरी
संबंधित गॅस एजन्सींची तात्काळ सखोल चौकशी करून काळ्या बाजारात गॅस विक्री करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर व नियमित गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा.
अन्यथा सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta