निपाणीत दीपक दळवींची शोकसभा; सीमा लढा यशस्वी करण्याचा निर्धार
निपाणी (वार्ता) : कर्नाटक -महाराष्ट्र सीमा लढ्याचा सक्रिय सहभाग घेऊन दीपक दळवी यांनी प्रशासनाच्या विरोधात बुलंद आवाज उठवत मराठी भाषकांना जागृत करण्याचे काम केले होते. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. त्यांनी बऱ्याच वेळा न्यायालयाबरोबरच रस्त्यावरची लढाई ही करून मराठी भाषिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या निधनाने सीमा भाग पोरका झाल्याची भावना येथे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांतर्फे आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली.
प्रारंभी स्तब्धता पाळून सीमा लढ्याचे नेते दीपक दळवी, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या पत्नी स्मिता चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात आली. श्रीमंत विजयराजे देसाई सरकार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर मराठी भाषिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात भाषावार प्रांतरचना करण्यात आली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यावेळचे म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटक राज्याची स्थापना झाली. आणि ८६५ मराठी खेडी त्यात डांबली गेली. नंतरच्या काळात मराठी भाषिकांनी लढा देऊन मुंबईचा ‘गड’ मिळवला. पण बेळगावचा ‘सिंह’ मात्र गमावल्याची भावना व्यक्त केली.
आजही या भागातल्या मराठी भाषकांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवला आहे. पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी सीमा लढ्यासाठी झोकून दिल होते. त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगवासी सहन करावा लागला होता. कर्नाटक शासनाकडून होणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात त्यांनी मराठी भाषकांचा आवाज कायम बुलंद केला होता. प्रशासनासमोर अभ्यासू, ठाम आणि प्रभावी भूमिका कशी मांडावी, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या पुढील काळातही त्यांचा लढा पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. दळवी यांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्यांची शिकवण, यांचा लढाऊ बाणा आणि मराठी अस्मितेसाठीचा जाज्वल्य अभिमान आम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत राहील, असेही शोकसभेत सांगण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर, प्रा. भारत पाटील, बाबासाहेब मगदूम, प्रशांत नाईक, नितीन इंगवले, बाळासाहेब सूर्यवंशी, सुधाकर कोरगावकर, उदय शिंदे, प्रा. एन. आय. खोत, दीपक वळिवडे, संदीप चावरेकर, किशोर सांगावकर, बाळासाहेब हजारे, झुंजार दबडे, बंडा पाटील, अजित पाटील अविनाश पाटील यांच्यासह मराठी भाषिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta