रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार ; शुक्रवारी दिली पुलाच्या ठिकाणी भेट
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने देऊन दुर्लक्ष केले आहे. पुलाचे काम सुरू करण्यासाठी उद्घाटन होऊनही प्रत्यक्षात पुलाचे काम सुरू नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांची घटनास्थळी बैठक घेतली. त्यावेळी मार्च झाल्यानंतर कामाला सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही कोणतीच हालचाल नाही. दहा दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. शुक्रवारी (ता.३) आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन हा इशारा दिला आहे.
पोवार म्हणाले, पुलाच्या कामाचे प्रस्ताव पाठविल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आप्पाचीवाडी येथील पुलाचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. किमान ५० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला सुसज्ज पूल येथे उभारणे आवश्यक आहे. या पुलामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस तसेच इतर पिकांची वाहतूक करणे सोपे होणार आहे. आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवस्थान हे जागृत असल्याने येथे कर्नाटक -महाराष्ट्र आणि इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात या सर्वांच्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांत पुलाच्या कामाला प्रारंभ न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.
यावेळी सूर्याजी पोटले, सचिन पटेकर, किसन पोटले, बी एच बोते, लक्ष्मण दळवी, शिवाजी माने, अंकुश माने, प्रदीप माने, अशोक वडे, आशिष करे, आनंदा जालपुरे, सुभाष पत्रावळे, कुमार पत्रावळे, रुपेश खोत, बाबासाहेब कुरणे, रावसाहेब कुरणे यांच्यासह संघटनेचे विविध गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta