शांडगे कुटुंबाचा उपक्रम : पारंपारिक प्रथांना बगल
निपाणी(वार्ता) : येथील मंगळवार पेठ मधील शांडगे परिवारामार्फत भारती शांडगे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक प्रथांना बगल देत पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध संस्थांमध्ये भेटवस्तू आणि शैक्षणिक साहित्य देऊन अनोखा उपक्रम राबविला आहे. त्याचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे.
सागर शांडगे हे अर्जुन नगर ता कागल येथील मोहनलाल दोशी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्री भारती शांडगे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पहिला स्मृतिदिनानिमित्त या कुटुंबीयांनी कोणतेही पारंपारिक कार्यक्रम न करता समाजासाठी वेगळाच उपक्रम राबविला आहे. या परिवारातर्फे कोल्हापूर येथील जिल्हा परिविक्षा व अनुसंरक्षण केंद्र येथील बालकांना शैक्षणिक साहित्य,जेवणाचे डबे तर मोहनलाल दोशी विद्यालयातील ग्रंथालयास पुस्तके अशा स्वरूपात सुमारे १५ हजाराचे साहित्य भेटदेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
सागर शांडगे यांनी, समाजात अजूनही अनेक जुन्या चालीरीती कार्यरत आहेत. त्यापैकीच दर वर्षी अनेक जण आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम व भोजनाचे आयोजन करतात. पण आपण या पारंपारिक रीतीरिवाजाला फाटा देऊन शैक्षणिक साहित्य व गरजू विद्यार्थ्यांना इतर साहित्याचे वाटप केले आहे. यापुढील काळातही समाजातील नागरिकांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ब्रम्हाकुमारी श्रद्धा बहेन पूजा दोडमनी, संजय चौगुले, बाळासाहेब शिरगावे, प्रतिक्षा शांडगे, आर. डी. पाटील, संकेत चौगुले उपस्थित होते. या उपक्रमास ते जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशीषभाई शाह यांचे प्रोत्साहन लाभले.