
निपाणी (वार्ता) : अजित माने दिग्दर्शित हेल्मेट लघु चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच निपाणी येथे पूर्ण झाले. ’हेल्मेट गरज सुरक्षेची एक सामाजिक जाणिव असणारी राष्ट्रीय लघुफिल्म असून यामध्ये आपण निष्काळजी राहिल्याने काय परिणाम भोगावे लागतात, याचे जिवंत उदाहरण हेल्मेट या चित्रपटातून अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडले आहे. हा सस्पेन्स व अंगावर शहारे आणणारा हृदयस्पर्शी लघुचित्रपट आहे. तसा हा लघुपट चार भाषेत डब होत आहे. या चित्रपटाचे निर्माते लिंगेश्वर देवकते आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अजित माने, केतकी गावडे, आदित्य पाटील, शंतनू, स्नेहा, सिंचना, किशोरी, दीया, प्रार्थना, देवयानी व सई यांच्या भूमिका आहेत.
निपाणी बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, सहाय्यक उपनिरीक्षक आनंद कुंभार, अॅड. सुषमा बेंद्रे यांचे निपाणी येथील चित्रीकरणास विशेष सहकार्य लाभले. हेल्मेट समाजाला प्रेरणा देणारा लघुपट असून अजित माने यांचे कार्य कौतुकास्पद आहे. हेल्मेट लघुपट प्रत्येकांनी जरुर पहावा, अशी प्रतिक्रिया आनंद कॅरकट्टी यांनी व्यक्त केली. तर हेल्मेट सारखा समाजाला दिशा देणारा असा सामाजिक चित्रपट निपाणीत केल्याबद्दल अजित माने यांचे अॅड. सुषमा बेंद्रे यांनी आभार व्यक्त केले. धर्मवीर संभाजी चौक परिसरात सदर लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta