निपाणी (वार्ता) : जत्राट – भिवशी पुलाखाली रविवारी सकाळी ३० ते ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. आज सकाळी सातच्या सुमारास नदीकाठच्या परिसरात गेलेल्या नागरिक व शेतकऱ्यांना नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून अज्ञात मृतदेह वाहून आल्याचा प्रकार दिसून आला.
या घटनेची माहिती नागरीकांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळी सीपीआय संगमेश शिवयोगी, तहसीलदार प्रवीण कारंडे, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी, हवालदार प्रकाश सावोजी, मारुती कांबळे यांनी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. पाण्याचा प्रवाहातून नदीच्या काठाला आलेला मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाजूला घेतला. मृतदेहावरील जखमा व इतर खुणांची पाहणी केली, असता मृतदेहाच्या उजव्या हातावर एस सारखी छाप असुन डाव्या हातावर मराठीत जयश्री असे अक्षर लिहिले आहे.
हा मृतदेह महाराष्ट्रातील असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. असे असली तरी हा प्रकार घातपात असावा की आत्महत्या याबाबत पोलिसांनी सांशकता व्यक्त केली असून आढळून आलेला मृतदेह सडला असल्याने पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
Belgaum Varta Belgaum Varta