मंत्री शशिकला जोल्ले : जवाहर तलावावर गंगापूजन
निपाणी (वार्ता) : यावर्षी निसर्ग आणि पावसाने चांगली साथ दिल्याने शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारा येथील जवाहर तलाव भरून ओसंडून वाहत आहे. त्या पाण्याचे पूजन आता झाले असून लवकरच शहर आणि उपनगरातील सर्वच विभागाला २४ तास पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. रविवारी (ता.२१) येथील जवाहर तलावावर गंगा पूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रारंभी उदय यरनाळकर यांच्या पर्वत्याखाली नगराध्यक्ष जयवंत भाटले दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले व अण्णासाहेब जोल्ले दाम्पत्यांच्या हस्ते तलावातील पाणी पूजन झाले.
मंत्री जोल्ले म्हणाल्या, येथील टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष पदी अभय मानवी सदस्य पदी आकाश शेट्टी आणि विश्वनाथ जाधव यांची नियुक्ती झाली आहे. आता विकास वासुदेव यांची निवड झाली आहे. सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या निवारण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. याशिवाय प्रभागातील बचत गटांची माहिती घेऊन त्याची नोंद आपल्या कार्यालयास केल्यास त्यांना शासकीय सवलती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी, गतवर्षीपेक्षा यावर्षी तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. शहरातील ७५ टक्के भागात २४ तास पाणी सुरू झाले आहे. तात्काळ या पाणी योजना कंत्राटदारांची बैठक घेऊन उर्वरित सर्वच भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रभागातील नगरसेवकांनी लिकेजकडे लक्ष देऊन त्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडे द्यावी. नागरिकांनीही पाण्याचा दुरुपयोग टाळून नळांना चाव्या बसविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरसेवक संतोष सांगावकर, सद्दाम नगारजी, दत्ता जोत्रे, दीपक पाटील, नगरसेविका उपासना गारवे, सोनल कोठडीया, प्रभावती सूर्यवंशी, आशा टवळे, सुजाता कदम, अरुणा मुदकुडे, कावेरी मिरजे, सुरेश शेट्टी, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष अभय मानवी, यांनी प्रवीण कणगले, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीमंत दादाराजे देसाई, आकाश माने, रवींद्र इंगवले, विनोद बागडे, विजय टवळे, आयुक्त जगदीश हुलगेजी, दीपक माने यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रणव मानवी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta