निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात फसवणूक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याला महिला व नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासूनच येथील बस स्थानक, मुरगुड रोड व महिलांची गर्दी असलेल्या ठिकाणी ही जनजागृती केली जात आहे. सध्या दिवाळी सण तोंडावर आल्याने खरेदीसाठी अनेक महिला सोन्याची दागिने घालून बाजारासाठी येत आहेत. अशावेळी काही भामट्यांचे टोळके येऊन पुढे दंगा सुरू असून आपण पोलीस असल्याचे भासवून दागिने काढून ठेवण्याचे आवाहन केले जाते. यावेळी संबंधित घंट्याकडून दागिन्यांच्या ऐवजी कापड अथवा कागदाच्या पुडी मध्ये दागिन्या ऐवजी दगड माती घालून संबंधित महिलांना देऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये. शिवाय आपली दागिने भामट्यांच्या हातात देऊ नये असे आवाहन पोलिसातर्फे केले जात आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी होण्याची शक्यता आहे अशावेळी महिलांनी अंगावर दागिने न घालण्याचे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.
शहरात बाजाराच्या निमित्ताने दररोज शेकडो वाहने जा करत आहेत. अशावेळी वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी येणाऱ्या व वाहनधारकांनी रस्त्यावर पार्किंग केल्यास वाहतुकीच्या कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे रिक्षा व खाजगी वाहतूकदारांनी आपली वाहने एका कडेला पार्किंग करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या जनजागृती मोहिमेत सहाय्यक उपनिरीक्षक बी. एस.पुजारी, हवालदार के. बी. दड्डी, जी. एस. काळसापगोळ व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
नागरिकांनी सहकार्य करावे
सध्या सणासुदीचे दिवस असून खरेदीसाठी शहरात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे या गरजेचा फायदा घेऊन लूटमारीच्या व दागिने चोरीच्या घटना घडू शकतात त्याबाबत पोलिसातर्फे जनजागृती केली जात असून नागरिकांनी सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta