पंकज पाटील : रुंदीकरणाची माहिती शेतकर्यांना द्यावी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. लगतच असणार्या टोल नाक्याजवळ शेतकर्यांच्या शेती जमिनी आहेत. रुंदीकरण सुरू असल्याने येथील शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नोटीसा बजावण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्या पाठीमागे महामार्गाची रुंदीकरण, होणारे ब्रिज याबद्दलची माहिती शेतकर्यांना देण्यात यावी अन्यथा रस्ता रुंदीकरणाला विरोध करण्यात येईल अशी सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आली होती. पण गेल्या चार-पाच महिन्यामध्ये संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची माहिती शेतकर्यांना न देता अचानक नोटीसा बजावले आहेत. यामुळे येथील शेतकरी संभ्रम अवस्थेत आले आहेत. या ठिकाणी होणारे रस्ता रुंदीकरण किती होणार आहे व या ठिकाणी ब्रिज होणार की नाही यासह अन्य सर्व गोष्टी शेतकर्यांना सांगून शेतकर्यांची यामध्ये शेती जमीन किती जाणार आहे याची पूर्ण माहिती दिल्याशिवाय या ठिकाणी काम सुरू करू दिले जाणार नाही, असा इशारा माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिला.
कोगनोळी तालुका निपाणी येथील टोलनाका परिसरातील शेतकरी व व्यावसायिक यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना पंकज पाटील म्हणाले, महामार्ग रुंदीकरण संबंधित अधिकारी हे फक्त एका व्यक्तीला बोलवून संबंधित शेतकर्यांना सांगावे अशी माहिती देण्यात येत आहे. त्यांनी असे न करता संबंधित सर्व शेतकर्यांना बोलवून महामार्ग रुंदीकरण बाबतची माहिती शेतकर्यांना द्यावी. टोल नाका व परिसरात शेतकर्यांच्या शेती जमिनी किती जाणार आहेत. व त्या बदल्यात त्यांना मोबदला किती मिळणार आहे. यासह अन्य माहिती शेतकर्याला देण्यात यावी. या ठिकाणी व्यावसायिक व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत असतात या व्यावसायिकांची नुकसान भरपाई कशी करणार, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कामगार मोलमजुरी करत आहेत. त्यांची नुकसान भरपाई कशी देणार या सर्व गोष्टीची माहिती संबंधित अधिकार्यांनी द्यावी अन्यथा या ठिकाणी महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशारा पंकज पाटील यांनी यावेळी दिला.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य दिलीप पाटील, नारायण पाटील, श्रीकांत पाटील, राजू पाटील, पुंडलिक माळी, नागेश पाटील, सचिन पाटील, अरुण पाटील, रोहित माणकापूरे, सुहास पाटील, आनंदा भोसले, विजय कोरवी, राजू चौगुले, विलास सोलापूरे, संतोष सोलापूरे, विजय कांबळे, युवराज माने, रामा वडर यांच्यासह टोल नाका परिसरातील शेतकरी, व्यावसायिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta