धनत्रयोदशी, पाडव्याला गर्दी :सर्वच रस्ते गर्दीने फुलले
निपाणी : दोन वर्षानंतर यंदा कोरोना मुक्त वातावरणात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी झाली होती. त्यानिमित्ताने सर्वच दुकानात कोठ्यावधी रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तु, कपडे यांचा समावेश होता.
गेल्या काही वर्षात ऊस, सोयाबीन व इतर शेतमालाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी आर्थिक मंदी काहीशी दूर झाली. तर पावसामुळे खरीप चांगला साधला होता. मात्र, परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या उत्सवाला मर्यादा आल्या होत्या, मात्र दोन वर्षांनंतर हा सण साजरा करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. तयार कपडे, ड्रेस मटेरियल, मोबाईल, टीव्ही, रेफ्रिजरेटर, दुचाकी संगणक, गृहोपयोगी वस्तू, सुका मेवा, मिठाई दुकानातून ग्राहकांची गर्दी दिसून आली.
सोन्याच्या दरामध्ये काहीशी वाढ झाली असली तरी सोने खरेदीशिवाय दिवाळी नाही, असे समीकरण झाल्याने अनेकांनी सोन्याची खरेदी केली. शहरांमधील सर्व सराफपेढ्या रात्री उशिरापर्यंत गजबजून गेल्या होत्या.
लक्ष्मीपूजनासाठी लागणारी फळे, फुले, पूजेचे साहित्य, फटाके, ऊस रोप खरेदीसाठी म्युनिसिपल हायस्कूल पटांगण, कॉलेज, अकोळ क्रॉस येथे गर्दी झाली होती. फुलाचा भाव ८० ते १०० रुपये होता. दिवाळी सणात या व्यवहारात ७ ते ८ कोटींची उलाढाल झाल्याची व्यवसायिकांनी सांगितले.
—-
सायकलांची खरेदी
गेल्या दोन वर्षापासून पेट्रोलचे दर वाढले आहेत. याशिवाय व्यायामाची गरज वाढल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही सायकल खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच दुकानदारांनी विविध प्रकार आकाराचे सायकली उपलब्ध केल्या होत्या. दिवाळी पाडव्या विषयी त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
—
चार चाकी वाहनांचे वटिंग
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आठवड्यापूर्वी कोल्हापूर, बेळगाव येथून चार चाकी वाहनांचे बुकिंग केले होते. पण अशा वाहनांना वेटिंग असल्याने दिवाळीत काही प्रमाणात वाहन खरेदी दारांची निराशा झाली.
Belgaum Varta Belgaum Varta