आम आदमी : आगार प्रमुखांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी परिसर व ग्रामीण भागातील हजारोंच्या संख्येने दररोज विद्यार्थ्यांची वाहतुक होत असते. बसेसची संख्या नगण्य असल्याने विद्यार्थ्यांना वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे. त्यामुळे असंख्य विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये गर्दी करून अक्षरश: चेंगराचेंगरीच्या परिस्थितीत आपले गाव गाठतात. प्रसंगी बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा नसल्याने ते प्रवेशद्वारावर लोंबकळताना प्रवास करतात. या परिस्थितीची दखल घेवून येथील आम आदमी पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना अधिक बसची सुविधा द्यावी. बसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशी घेवू नयेत. याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना देण्यात आले.
नुकत्याच मोरबी येथे घडलेल्या दुर्घटनेत शेकडो लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशा प्रकारची घटना येथे होवू नये यासाठी प्रशासनाने कारवाई करावी. ३० रोजी निपाणी येथून खडकलाट गावी जाणाऱ्या बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त व दरवाजा जवळ लोंबकळत असलेले विद्यार्थी दिसून आले. अधिक भरणा केलेल्या प्रवाशांमुळे बस धोकादायकरित्या एका बाजूला झुकली होती. त्याचा कोणत्याही क्षणी अपघात होवू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आम आदमी पार्टीने याची गांभिर्याने दखल घेवून तात्काळ निपाणी बस आगार प्रमुखांना भेटून सदर परिस्थिी सुधारण्या विषयी निवेदन सादर करण्यात आले. मात्र यावेळी आगार व्यवस्थापकांनी त्यांना असमर्पक उत्तरे दिली. त्यामुळे याविषयी पुढील धोरण ठरवून आम आदमी पार्टीच्या वतीने काम करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजेश बनवन्ना यांनी दिली आहे. यावेळी आदर्श गिजवणेकर, वसीम पठाण, अक्षय कार्वेकर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
————————————————————
प्रवासी पहिले, विद्यार्थी नंतर
निपाणी आगारातील सर्वच बसमध्ये सुरुवातीला प्रवाशांचा भरणा केला जातो. त्यानंतर जागा शिल्लक असल्यास विद्यार्थी विद्यार्थिनींना बसमध्ये घेतले जाते. मात्र सर्वांचे विद्यार्थी वर्षापूर्वीच बसचे भाडे घेऊनही त्यांना प्रवाशानंतर आत घेतले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी मधून संताप व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta