
संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त करजगा रस्त्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथील दुबैलगाडी शर्यतीत सात दुबैलगाडी सहभागी झाल्या होत्या. सात किलोमीटरचे अंतर फर्लांगभर अंतराने पार करीत तासगांवचे प्रमोद थोरात यांच्या बैलजोडींने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावर अथनीच्या शंकर यांच्या बैलजोडीला समाधान मानावे लागले. शर्यतीचे तिसरे बक्षिस रत्नजीत पाटील (नदवाल) यांच्या बैलजोडींने पटकाविले. शर्यतीचे अंतर थोडे जादा झाल्याने मुक्या बैलांचे हाल झालेले पहावयास मिळाले. घोडेस्वार शर्यतीत शंकर पट्टणकुडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. दुसऱ्या क्रमांकावर चारु आर्मी रायबाग यांना समाधान मानावे लागले. तिसरे बक्षिस पिल्लू कागे (पट्टणकुडी) यांनी पटकाविले. घोडागाडी शर्यत मोठी चुरशीची ठरली. कणगला येथील सुदर्शन हिरेमठ यांची घोडागाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस रोहित वराजे (निपाणी), तिसरे बक्षिस सदा (निपाणी) यांच्या घोडागाडीने पटकाविले.
मोटारसायकलींचा ताफा
शर्यतीत दुचाकी वाहनांचा ताफा धावणाऱ्या बैलांना, घोड्यांना अडचणीचा ठरलेला दिसला. दुचाकींच्या गराड्यातून धावतांना बैलांची दमछाक उडालेली दिसली.
विजेत्यांना अशोक हिरेकोडी, बाळू अंकले, शिवा कल्याणी, राजू कमते, त्र्यंबक पाटील आणि शर्यत कमिटी पंचमंडळींकडून बक्षिसे देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta