
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील लोक विकास कामाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. याला मुख्याधिकारी जगदीश ईटी हेच कारणीभूत ठरल्याने त्यांच्या हकालपट्टी करायला हवी असल्याचे माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब असल्यामुळे गावात विकास कामे रखडलेली दिसताहेत. स्वच्छतेच्या नावाने लोक शिमगा करत आहेत. त्याच सोयरसुतक ईटी साहेबांना दिसेनासे झाले आहे. अशा कामचुकार मुख्याधिकारीला पालिकेत ठेवून कत्ती सावकार आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेताहेत. एकीकडे कत्ती सावकार संकेश्वरात कमी मतांचा टक्का वाढविण्यासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे घेऊन येत आहेत. त्या कामावर पाणी सोडण्याचे काम ईटी करताहेत. संकेश्वरचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर हुक्केरीचे आमचे लाडके आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश अण्णा कत्ती यांनी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची ताबडतोब अन्यत्र बदली करायला हवी आहे. प्रभाग क्रमांक 16 आणि 17 मधील 20 विकास कामांची यादी नगरसेविका सौ. श्रीविद्या बांबरे यांनी सादर केली आहे. त्यातील शुल्लक काम ईटी यांनी हाती घेतले आहे. बाकीची प्रमुख विकास कामे रखडत ठेवण्यात आली आहेत. मठ गल्ली ते हिटणी रस्त्याचे काम कधी करणार कोण जाणे. श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेपासून मठ गल्लीत स्वच्छतेचे काम झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta