आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा धुराचा लोंढा बाहेर पडू लागल्याने सुभाष रस्ता येथील नागरिकांनी दुकानाचे शटर खोलून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले पण दुकानाचे शटर कांही केल्या उघडता येईना. त्यामुळे दुकान मालक प्रविण मुगळी यांना बोलावून घेतले. त्यांनी येऊन शटर उघडताच आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने लागलीच संकेश्वर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम केले. आगीच्या घटनेत अरिहंत फँन्सी स्टोअरमधील लेडिज कॉस्मेटिक, पर्रफ्यूम, बांगड्या, मेहंदी, मास्क, सॅनिटायझर अशा सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
घटनास्थळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, अॅड. एस. एन. जाबण्णावर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी यांनी भेट देऊन प्रविण मुगळी याला धीर देण्याचे कार्य केले आहे.
घटनास्थळी हुक्केरी ग्रामीण विद्युत संघाचे कर्मचार्यांनी धाव घेऊन आगीची घटना नेमकी कशामुळे घडली यांची माहिती घेतली आहे. संकेश्वर पोलिसांत आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
इन्व्हर्टरमुळे आग
अरिहंत दुकानाला इन्व्हर्टरने आग लागल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे दुकानात इन्व्हर्टर चार्जिंगला लावण्यात आले होते. इन्व्हर्टर स्पार्क होऊन आग लागली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
कोरोनामुळे अरिहंत घाट्यात
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे वेळोवेळी लॉकडाऊन लादले जात आहे. त्यामुळे व्यापारी व्यवसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. विकेंड लॉकडाऊनचा फटका देखील बसू लागला आहे. त्यातच प्रविण यांच्या दुकानांची आगीच्या घटनेत राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी शासनाकडून प्रविण मुगळी यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची मागणी लोकांतून केली जात आहे.
Check Also
हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध
Spread the love हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …