
संकेश्वर (महंमद मोमीन) : आर्द्रा नक्षत्र काळात बरसणारा पाऊस खरीप पेरणीला पोषक ठरलेला दिसतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी धांदल उडालेली दिसत आहे. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक होत गेला तशी बैलांची संख्या बऱ्याच प्रमाणात घटलेली दिसत आहे. त्यामुळे उपलब्ध बैल जोडीला पेरणीसाठी मोठी मागणी दिसत आहे. मृग नक्षत्र काळात बरसणारा पाऊस दडी मारल्याने खरीप पेरण्या वीस-पंचवीस दिवस लांबणीवर पडल्या आहेत. आता कोठे पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी धांदल उडालेली दिसत आहे. एकाच वेळी सर्वत्र पेरण्यांची घाईगडबड चालल्यामुळे बैलांचा तुटवडा जाणवू लागला आहे. पेरणीसाठी बैलांची ॲडव्हान्स बुकींग चाललेली दिसत आहे. बुकींगनुसार बैलजोडीने पेरणीचे काम केले जात आहे. गतवर्षी सोयाबीन पिकांने शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिल्यामुळे यंदा देखील ८०% शेतकऱ्यांचा कल सोयाबीन घेण्याकडे दिसत आहे. बैलजोडीने सोयाबीन पेरणी करुन देण्यासाठी एकरी १५०० रुपये आकारणी केली जात आहे. ट्रॅक्टरने पेरणीसाठी १८०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे जादातर शेतकरी बैलजोडीने पेरणी करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. खरीपात शेतकऱ्यांचा कल जादा तर सोयाबीन घेण्याकडे राहिल्याने भुईमूग शेंगा, मूग, उडीद यांचे प्रमाण केवळ २०% मात्र दिसत आहे.
हुक्केरीत पन्नास टक्के बागायतदार
हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी हुक्केरी मतक्षेत्रातील २५ हून अधिक तलाव भरणीचे काम केल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे येथील जिरायती शेती आता बागायती झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे हुक्केरी मतक्षेत्रात उसाचे क्षेत्र ५०% झालेले दिसत आहे. ऊस पीक चांगले उत्पन्न मिळवून देणारे असल्याने बागायतदार शेतकऱ्यांची पहिली पसंत ऊस पीक घेण्याची झालेली दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta