संकेश्वर (प्रतिनिधी) : जगद्गुरुंना सर्व भक्तगण सारखेच असल्याचे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर गोरक्षणमाळ डोंबारी गल्लीतील श्री. रासाईदेवी, श्री रेणुकादेवी मंदिर कळसारोहण करुन श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री पुढे म्हणाले, डोंबारी समाज बांधव माझ्याकडे आले. त्यांनी मला रासाईदेवी कळसारोहण समारंभाला आमंत्रित केले. त्यावेळी मी त्यांना सांगितले तुमच्या कार्यक्रमाला मी नाही येणार असे तुम्हाला का वाटते. जगद्गुरु श्री शंकराचार्यांना सर्व भक्तगण समान आहेत. तुम्ही माझे भक्तगण आहात. मी तुमच्या कार्यक्रमाला नक्की येईन. त्यानुसार आज मी रासाईदेवी, रेणुकादेवी मंदिर कळसारोहण समारंभाला उपस्थित असल्याचे श्रींनी सांगितले. श्रींच्या अमृतहस्ते श्री रासाईदेवी, श्री रेणुकादेवी कळसारोहण सोहळा पार पडला. यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांचा डोंबारी समाजातर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाविषयी बोलताना राजू पाटील म्हणाले, श्री रासाईदेवी, श्री रेणुकादेवी मंदिर वास्तू शांती, मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण कार्यक्रम श्रींच्या दिव्य सानिध्यात अनेक मान्यवरांच्या आणि भक्तगणांच्या उपस्थित पार पडला आहे. आमचा डोंबारी समाज गरीब असला तरी प्रामाणिक आहे. देवावर श्रध्दा ठेवणारा आहे. बेळगांव, सावंतवाडी, कोल्हापूर येथील आमच्या समाजबांधवांनी, देणगीदारांनी भरभरुन दिलेल्या देणगीतून मंदिर उभारणेचे कार्य करण्यात आले आहे. यावेळी नवक्रांती युवक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश खोरागडे, उपाध्यक्ष शिवाजी खोरागडे, सुनिल पाटील, राजू पाटील, चंद्रकांत पाटील, रंजन खोरागडे, सागर सोनटक्के, पवन पाटील, सुभाष पाटील मंदिराचे पुजारी शिवाजी पाटील समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
श्रींचे जल्लोषात स्वागत
संकेश्वर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे आगमन होताच श्रींचे पुष्पवृष्टीत,ढोल-ताशांच्या गजरात, पंचारती ओवाळून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
समारंभाला मान्यवरांच्या शुभेच्छा
श्री रासाईदेवी, रेणुकादेवी मंदिर वास्तू शांती, मूर्ती प्रतिष्ठापना आणि कळसारोहण समारंभात सहभागी होऊन उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, पवन कत्ती, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, ॲड. प्रमोद होसमनीसह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.