मौजमजेची पार्टी पडली महागात..
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जवळील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर निपाणीहून संकेश्वर अनंतविद्यानगरकडे भरवेगात येणाऱ्या मोटारसायकलचा ताबा सुटून खड्ड्यात जोराने कलंडून झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तिघे मित्र जागीच ठार झाले असून एकाचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर अपघात गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पावणेबाराच्या दरम्यान घडला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून आणि प्रत्यक्षदर्शी लोकांतून समजलेली माहिती अशी की, संकेश्वरातील तिघे मित्र पार्टी ठरवून त्यात बेळगांवच्या एका मित्रालाही समावून घेतले. ठरल्यानुसार चौघे एकाच मोटारसायकल क्रमांक २३/ एस.७२५६ वर स्वार झाले. ठरल्या ठिकाणी जाऊन पार्टी केली. पार्टी आटोपून संकेश्वरकडे येत असताना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन सर्व्हिस रोडवर स्टाईलने दुचाकी वळवून घेतली. मोठ्या हुरुपाने दुचाकीचा वेग आणखी वाढविला. दुचाकी चालक बसवराजचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल भरवेगात जावून रस्त्याकडेच्या खड्ड्यात जोराने कलंडून झालेल्या अपघातात बसवराज अर्जुन माळी (वय २६) राहणार अनंतविद्यानगर संकेश्वर, प्रविण कलप्पा सनदी (वय २४ ) राहणार अनंतविद्यानगर संकेश्वर, मेहबूब सय्यद शेगडी (वय २१ ) राहणार अनंतविद्यानगर संकेश्वर जागीच ठार झाले. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या फरहान मलिक जमादार (वय २१) राहणार खंजर गल्ली बेळगांव याला प्रत्यक्षदर्शी लोकांनी ताबडतोब १०८ ॲब्युलन्सला बोलावून उपचारार्थ बेळगांव जिल्हा रुग्णालयाकडे पाठवून दिले. फरहान गंभीर जखमी झालेला असल्याने उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, हवालदार जी. एस. शिवाणगोळ, प्रल्हाद बंडगर, मेहबूब दादामलिक घटनास्थळी पोचून अपघातातील जखमीला प्रथम उपचारार्थ इस्पितळाकडे पाठवून दिले. अपघाताचा पंचनामा करून तिघांचे शवविच्छेदनसाठी पाठवून दिले. संकेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अपघात ठिकाणी तिघे रक्ताच्या थारोळ्यात
अपघाताची माहिती मिळताच नजिकच्या पेट्रोल पंपातील कामगार घटनास्थळी धावून गेले. त्यांनी सांगितले की अपघाताची भीषणता अंगावर शहारे आणणारी होती. मोटारसायकल खड्ड्यात कलंडली होती. अपघातातील तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात धडफडत होते. कांहीं मिनिटांतच तिघे गतप्राण झाले. एकटा हातवारे करून मदतीची याचना करीत होता. त्याला लागलीच पोलीसांनी उपचारार्थ इस्पितळाकडे पाठवून देण्याचे काम केले.
खड्डा कधी मुजविणार
अपघातानंतर लोकांत एकच चर्चा होताना दिसली. निलकमल धाबा ते संकेश्वर-गडहिंग्लज ब्रिज दरम्यान सर्व्हिस रोडवर दोहो बाजूनी खड्डा आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांंना एखादे वाहन समोरुन आले तर मोठी अडचण होतें. सर्व्हिस रोडलगतचे खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे ठरल्याचे सांगितले जात आहे.
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
संकेश्वर येथील मोटारसायकल अपघातात चौघा मित्रांना जीव गमवावा लागला आहे. चौघा मित्रांचा अपघातातील दुर्दैवी अंत लोकांना शोले सिनेमातील किशोर कुमार यांच्या त्या गाण्याची आठवण करून देणारा ठरला आहे.
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. अपघातातील चौघे जीवलग मित्र गतप्राण झाले पण साथ कांही सोडली नाही.