दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव करत मोठा विजय आपल्या नावे केला आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने ८६ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण संजू झेलबाद झाल्याने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने गेला. संजूला बाद देण्याचा निर्णय हा वादग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. संजूला शुभम दुबेनेही मोठे फटके खेळण्यात साथ दिली, पण तो फार काळ मैदानात टिकू शकला नाही. दिल्लीने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ केवळ २०१ धावाच करू शकला आणि दिल्लीने २० धावांनी विजय नोंदवला.
संजू सॅमसनची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. संजू सॅमसन मैदानात शेवटपर्यंत टिकून राहणं राजस्थानसाठी महत्त्वाचं होतं. मुकेश कुमारच्या १५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर संजू मोठा फटका खेळायला गेला. पण सीमारेषेजवळ उभा असलेला शाई होपने त्याचा झेल टिपला. पण त्याचा पाय सीमारेषेला लागल्याचे राजस्थानचे मत होते. पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिले. या निर्णयानंतर संजू सॅमसन पंचांशी बोलताना दिसला. त्याने पुन्हा रिव्ह्यू घेण्याचाही प्रयत्नही केला पण तोवर वेळ निघून गेली होती. संजूला अखेरीस ४६ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांसह ८६ धावा करत मैदानाबाहेर जावे लागले. संजू बाद झाला तेव्हा संघाला २६ चेंडूत ६० धावांची आवश्यकता होती. हे लक्ष्य गाठणे अवघड होतेच पण सोबतच संघाचे दोन महत्त्वाचे फलंदाज ध्रुव जुरेल आणि शेमरॉन हेटमायर आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हते, ज्याचा संघाला मोठा फटका बसला.
दिल्लीने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात चांगली झाली नाही. यशस्वी जयस्वाल ४ धावा तर बटलर १९ धावा करत बाद झाला. संजू सॅमसनने संघाचा डाव सावरत ८६ धावांची विस्फोटक खेळी केली, पण विजय मिळवून देऊ शकला नाही. तर रियान परागने २२ चेंडूत २७ धावांची खेळी केली पण मोठी खेळी करू शकला नाही. शुभम दुबे १२ चेंडूत २५ धावांची शानदार खेळी केली. पण संजू बाद झाल्यानंतरही तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. तर फरेरिया, अश्विन स्वस्तात बाद झाले. पॉवेलने काही फटके खेळले पण मुकेश कुमारने त्याला अखेरच्या षटकात झेलबाद केले. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या तर अक्षर पटेल आणि रसिख दर यांनी १-१ विकेट मिळाली.
दिल्लीने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला करताना २२१ धावांचा डोंगर उभारला. जेक फ्रेझरने नेहमीप्रमाणे झटपट सुरूवात केली. तर अभिषेक पोरेलने त्याला चांगली साथ दिली. जेकने २० चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५० धावा केल्या. तर अभिषेक पोरेलने ३६ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह शानदार ६५ धावा केल्या. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने २० चेंडूत ४१ धावा केल्या. तर गुलबदिननेही १९ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे संघाची धावसंख्या २०० पार गेली.
राजस्थानचे गोलंदाज आज चांगलेच महागात पडले. बोल्टने ४८ धावा देत १ विकेट, संदीप शर्माने ४२ धावा देत १ विकेट, चहलने ४८ धावा देत १ विकेट तर आवेशने ४२ धावा देत एकही विकेट नाही घेतली. संघासाठी अश्विन एकमेव गोलंदाज होता, ज्याने २४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.